विदर्भात मुसळधार पावसाचा कहर - photo credit BT
नागपूर : गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन लाख हेक्टरांपेक्षा जास्त शेती पाण्याखाली गेली असून, ६०० हून अधिक घरे कोसळली आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अकोल्यात मोठा फटका –
१७ व १८ ऑगस्ट रोजी अकोल्यातील सहा तालुक्यांमध्ये ३८९ घरे उद्ध्वस्त झाली, तर सुमारे ५९ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले. २६ जनावरांचा मृत्यू झाला असून काटेपूर्णा, मोर्णा व निर्गुणा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एका भिंतीच्या दुर्घटनेत तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
बुलढाण्यात खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले –
सोमवारी चिखली, मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. खडकपूर्णा प्रकल्पाचे यंदा प्रथमच सर्व १९ दरवाजे उघडण्यात आले. पेनटाकळी प्रकल्पाचे नऊ दरवाजेही उघडले गेले आहेत. नाल्यांना आलेल्या पुरामुळे रस्ते बंद झाले असून चिखली तालुक्यातील शाळांना दोन दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती तीव्र –
शनिवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उमरखेड, महागाव आणि पुसद तालुके गंभीरपणे प्रभावित झाले आहेत. उमरखेडचा संपर्क तुटला असून, पळशी व संगम चिंचोली येथे परिस्थिती गंभीर झाली आहे. ईसापूर धरणाचे आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले असून खरबी–किनवट मार्गावरील वाहतूक थांबवावी लागली आहे.
मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान –
१६ ते १८ ऑगस्टदरम्यानच्या पावसामुळे १५ जनावरे मृत्युमुखी पडली, ३,३६५ घरे कोसळली आणि तब्बल ८० हजार हेक्टर शेतीवर पिकांचे नुकसान झाले आहे. महागाव, घाटंजी, आणी, झारी आणि पुसद हे तालुके विशेषतः बाधित झाले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन सज्ज –
प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू असून, धरणांवरील पाणीस्तरावर सतत लक्ष ठेवले जात आहे. बचाव पथके तैनात असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.