नागपूर – रॉकस्टार अकॅडमी नावाने गिटार शिकवणारे वर्ग चालवणाऱ्या एका २७ वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना बंदुकीच्या धाकावर जिवे मारण्याची धमकी देत सतत मानसिक त्रास दिला. हा प्रकार उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपीचे नाव सागर सिंग परोसिया (वय २७, सिव्हिल लाइन्स) असून तो उज्ज्वलनगर येथील सनशाइन अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर "रॉकस्टार अकॅडमी" नावाने गिटारचे क्लासेस चालवत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी जून २०२५ मध्ये गिटार शिकण्यासाठी या अकॅडमीत दाखल झाली होती. सुरुवातीला आरोपीने मुलीशी मैत्रीपूर्ण वागणूक दाखवत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
यानंतर, एका दिवशी त्याने क्लासच्या कोपऱ्यात नेऊन मुलीशी अश्लील वर्तन केले आणि गैरवर्तनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मुलीने गिटारचा क्लास सोडला. तथापि, २३ जुलै रोजी आरोपीने तिला फोन करून, "दहा मिनिटांत भेटायला आली नाहीस तर घरच्यांना ठार मारीन" अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने क्लासमध्ये गेल्यावर आरोपीने बंदूक आणि चाकूच्या धाकावर तिच्यावर अत्याचार केला.
पोलिसांच्या तपासात उघड झाले की, २३ जुलै ते १२ ऑगस्ट २०२५ दरम्यान आरोपीने वारंवार तिला फ्लॅटवर बोलावून धमकावत शारीरिक अत्याचार केले. यावेळी त्याने पीडितेच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी अनेकदा दिली. अखेर असह्य त्रासामुळे पीडित मुलीने कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगितली, त्यानंतर त्यांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.