ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर): तालुक्यातील सौंदरी गावात घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. गावातील एका व्यक्तीने अल्पवयीन, मानसिकदृष्ट्या विकलांग विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. रात्रीचा अंधार किंवा वीजपुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत आरोपी पीडितेवर अत्याचार करत असे. मुलीच्या मानसिक स्थितीमुळे ती हा प्रकार कुणालाही सांगत नव्हती. मात्र, शाळेतील शिक्षिकेने विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर सत्य बाहेर आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत कारवाई करत नरेश उर्फ नरेंद्र ठोंबरे (वय ४३) याला अटक केली. प्रारंभी भीतीमुळे पीडितेच्या कुटुंबाने तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली होती, परंतु शिक्षिकेच्या धाडसी पावलामुळे हा प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वडसा येथील एका शाळेत शिक्षण घेत आहे. वीज खंडित झाल्यावर किंवा अंधार पडल्यावर ती वारंवार घाबरून असंबद्ध बोलत असे, हे शाळेच्या शिक्षिकेच्या लक्षात आले. शिक्षिकेने तिला विश्वासात घेऊन विचारले असता, तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले.
आरोपी नरेश ठोंबरे मजुरीचे काम करतो. तो गावात असताना पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार करत असे, अशी माहिती पुढे आली आहे.
ही माहिती मिळाल्यानंतर शिक्षिकेने तात्काळ विद्यार्थिनीच्या आई-वडिलांना भेटून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा आग्रह केला. मात्र, आरोपीच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी तक्रार करण्यास नकार दिला. यानंतर शिक्षिकेने स्वतःच पुढाकार घेत ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ हालचाल केली. पोलिसांनी आरोपी नरेश ठोंबरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (एम), ६४, (२) (एम) के. ६५ (१) व्ही.एन. एस. पोस्को तसेच दिव्यांग अधिनियम २०१६ अंतर्गत ९२ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला रविवार (दि. १७) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, शिक्षिकेच्या धाडसी भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.