घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो; वाहतुकीसाठी मार्ग बंद
चंद्रपूर :- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडाझरी तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. पाण्याची पातळी धोक्याची मर्यादा ओलांडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी ओव्हरफ्लो मार्गाने बाहेर पडत असून, यामुळे घोडाझरी गेट मार्गावरून पाणी वाहत आहे. खबरदारी म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी सांगितले की, सध्या तलावातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून परिस्थिती धोकादायक आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. आज (२१ ऑगस्ट) परिस्थितीचा आढावा घेऊन मार्ग पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
नागरिकांना आवाहन
या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व परिसरातील ग्रामस्थांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घोडाझरी गेट मार्गावरून पाणी वाहत असल्याने जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेऊन या मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.