चार नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली : महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेलगत भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात बुधवारी (दि. २७ ऑगस्ट) सकाळी नक्षलवादी व सुरक्षा दलामध्ये तब्बल आठ तास चकमक झाली. या कारवाईत तीन महिला व एक पुरुष अशा चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
विश्वसनीय सूत्रांकडून नक्षलवादी दबा धरून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-६० चे १९ पथक आणि केंद्रीय राखीव दलाच्या जलद गती पथकाच्या (QAT) दोन तुकड्या जंगल परिसरात मोहिमेस सज्ज झाल्या होत्या. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोहीम थोड्या काळासाठी स्थगित करण्यात आली होती.
बुधवारी मोहिमेच्या वेळी जवान जंगल परिसरात दाखल होताच नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला आणि तब्बल आठ तास चकमक सुरू राहिली. या कारवाईनंतर घटनास्थळावरून एक SLR रायफल, दोन INSAS रायफल्स आणि एक ३०३ रायफल जप्त करण्यात आली आहे. सध्या मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.