शाळकरी विद्यार्थ्यांसह ६० नागरिकांचा पोलिसांनी केला थरारक बचाव
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या, नाले आणि धरणांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, अनेक मार्गांवरील पूल पाण्याखाली गेले असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
अशाच परिस्थितीत २३ जुलै रोजी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. विरुर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील वरुण ते विरुर रस्त्यावर पूर आलेल्या नाल्यामुळे महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या दोन बस चिचबोर्डी आणि सिर्शी गावाजवळ अडकून पडल्या. या बसमध्ये सुमारे २५ ते ३० शालेय विद्यार्थी आणि जवळपास तेवढेच गावकरी उपस्थित होते.
Read Also: अतिवृष्टीमुळे आज जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद
घटनेची माहिती मिळताच विरुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार, सपोनि संतोष वाकडे यांनी तातडीने पोलीस पथक आणि शासकीय वाहनांसह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आणि सुरक्षित स्थळी हलवले. त्यांच्या या धाडसी आणि तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.