अवकाळी पावसाच्या पुनरागमनामुळे देशभरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे. झारखंडमध्ये विजेच्या धक्याने चार जणांचा मृत्यू झाला असून, बिहारमध्ये तीन महिलांचा मृत्यू झाला व दोन महिला भाजल्या आहेत.
बंगालच्या उपसागरात गुरुवार, २४ जुलैपासून कमी दाबाचा नवीन पट्टा तयार होण्याची शक्यता असून, त्यामुळे अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा आहे. पाटणा हवामान केंद्रानुसार सध्या बिहारमध्ये मान्सून कमजोर आहे व पुढील ४८ तासांत फारसा पाऊस होणार नाही.
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले असून पुढील ७२ तासांत जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राजौरी जिल्ह्यात सैन्य कॅम्पची भिंत कोसळून तीन कारचे नुकसान झाले आहे.
वाराणसीमध्ये गंगेची पातळी दर तासाला २ सेमीने घटत आहे. सध्या गंगा ६९.२४ मीटरवर असून, अजूनही ८४ घाट पाण्याखाली आहेत. वरुणा परिसरातील सुमारे ३० हजार लोकसंख्या प्रभावित झाली असून ४०० कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. एनडीआरएफच्या टीम्सना पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आले असून सातत्याने गस्त सुरू आहे.
आज, बुधवारच्या दिवशी जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, आसाम आणि मेघालयसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात २६ जुलैपर्यंत पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता असून त्यानंतर नवीन पावसाळी फेरी सुरु होऊ शकते.
मध्य प्रदेशात मान्सून सक्रीय झाल्याने भोपाळ, इंदूर, तिकमगडसह २० जिल्ह्यांत मंगळवारी पावसाची नोंद झाली. जबलपूर, छिंदवाडा, डिंडोरी यांसह १५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सरासरी २१ इंच पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण सरासरीहून ५३ टक्क्यांनी जास्त आहे.
छत्तीसगडमध्ये रायपूर, दुर्ग, बिलासपूर आणि बस्तर या भागांत ४५८.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. शिमला (हिमाचल प्रदेश) येथे धुक्यामुळे दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी झाली आहे. सतलज नदीवरील धरणातून पाणी सोडल्यामुळे पाण्याची पातळी ४–५ मीटरने वाढण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंजाबमधील पठाणकोट, होशियारपूर, रूपनगर आणि मोहालीमध्ये जोरदार पावसामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पठाणकोटमध्ये ५० मिमी व लुधियानात ३१ मिमी पावसाची नोंद झाली. एका पूलावरून कार वाहून गेल्याने महापौर बलजीत सिंह यांनी धाडसीपणे पाण्यात उडी घेत कुटुंबाचे प्राण वाचवले.
दिल्ली व एनसीआरमध्येही बुधवारी सकाळी जोरदार पावसामुळे वाहतूक कोंडी व पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत.