चंद्रपूर जिल्ह्यात एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. वरोरा शहरात एका 20 वर्षीय युवकाने एका चार वर्षीय अल्पवयीन चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या घटनेमुळे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि बालहक्क संरक्षण समित्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
ही धक्कादायक घटना सोमवार, 21 जुलै रोजी रात्री घडली असून मंगळवारी ती उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव साहिल तेलंग (वय 20 , राहणार वरोरा, जि. चंद्रपूर) असे आहे.
वरोरा शहरातील तलाव परिसरात नगरपरिषदेच्या अखत्यारीत एक उद्यान काही वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते. अलीकडच्या काळात त्या परिसरात व्यसनाधीन युवकांचा वावर वाढल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपीने साई मंगल कार्यालयाजवळ राहणाऱ्या एका चिमुकल्याला चॉकलेटचे आमिष दाखवून तलाव परिसरात नेले आणि अनैसर्गिक कृत्य केले.
घटनेची माहिती काही नागरिकांना मिळताच त्यांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर पीडित मुलाने घरी जाऊन आपल्या वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यावरून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या संपूर्ण कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, पोलिस उपनिरीक्षक मनोज वासाडे, शरद मस्के आणि तीरानकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.