![]() |
झाडाला धरून वाचवला जीव |
गडचिरोली | २३ जुलै २०२५: मुलचेरा तालुक्यातील गोमणी गावातील ग्रामसेवक उमेश धोडरे (वय ४५) यांची काल सायंकाळी कोलपल्ली नाल्याच्या वाढत्या पुराच्या पाण्यात अडकल्याने अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पूरामुळे त्यांचे चारचाकी वाहन वाहून गेल्याने काही काळ त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता.
सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धोडरे हे आपल्या वाहनातून नाल्याचा पूर ओलांडत असताना पाण्याचा जोरदार लोंढा आल्याने त्यांचे वाहन नियंत्रणाबाहेर गेले. वाहनासह वाहून जाताना धोडरे यांनी प्रसंगावधान राखत जवळील झाडाला धरून आपला जीव वाचवला.
Read Also: हवामान विभागाचा अलर्ट! देशभरात जोरदार पावसाची शक्यता
या घटनेची माहिती मिळताच, जिल्हा प्रशासनाने तात्काळ पावले उचलत महसूल विभाग, पोलीस आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी पाठवले. समन्वयाने आणि अचूक नियोजनातून धोडरे यांची धाडसी आणि यशस्वी सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी घरी रवाना करण्यात आले. या प्रकारामुळे जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेची तत्परता आणि कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या घटनेनंतर नागरिकांना आवाहन केले की, मुसळधार पावसाच्या दिवसांत नाल्यांमध्ये अचानक पूर येण्याचा धोका वाढतो आहे. अशा वेळी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नये आणि पूरग्रस्त भाग, पाण्याखाली गेलेले पूल किंवा ओढ्यांतून प्रवास करण्याचे टाळावे.
"जिवाचा धोका पत्करू नका; सुरक्षिततेला प्राधान्य द्या," असे आवाहन त्यांनी केले.
या घटनेतून प्रशासनाची कार्यक्षमता आणि नागरिकांनी आपत्ती काळात घ्यावयाची काळजी यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.