चिचडोह बॅरेजचे 38 दरवाजे उघडले… 7,439 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग
गडचिरोली,दि.२५ : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या चिचडोह बॅरेजमधून आज दिनांक 2५ जुलै 202५ रोजी सकाळी १० वाजता प्रकल्पाचे सर्व 38 दरवाजातून 7,439 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या नदीकाठाने राहणाऱ्या गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
अशातच गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये (gosikhurd dam) सतत पाऊस पडत असल्याने असल्याने गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 27 गेट 0.50 मी. ने उघडलेले असुन 3024.53 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे.
वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 कि.मी. अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झालेले आहे. सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीचे वरचे बाजुस 4 किलोमिटर अंतरावर आहे. याची एकूण लांबी 691 मीटर असून त्यावर 15 मीटर लांबीचे व 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत.
या गावांना आहे धोका:
गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव, घारगाव, फराडा, वाघोली, चामोर्शी, हल्दीपूरानी, टेकडा, दोटकूली, कळमगाव, खंडाळा. एकोडी, अनकोडा, इल्लूर, नविन लोंढोली, आष्टी, चपराळा, गणपूर व कढोली. तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील लोंढोली, उसेगाव, पार्डी, बेंबाळ, जिबगाव, पेठगाव, शिर्सी,साखरा, कोरंबी, बोरघाट, देवाळा (बु), चखठाणा,विठ्ठलवाडा, पिपरी व घाटकूळ.
वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदीलगतचे सर्व गावकऱ्यांनी सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करतांना उचित सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरी, नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे यांनी केले आहे.