गडचिरोली: मागील रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली-नागपूर महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी बस अडकून पडल्या. याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने त्वरीत आपत्ती व्यवस्थापन पथक आणि जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही बस सुरक्षितरित्या बाहेर काढल्या. या झपाट्याने पार पडलेल्या कार्यवाहीमुळे दोन्ही बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून, प्रवाशांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले. काहींनी तर 'महाराष्ट्र शासन जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या.
आरमोरी मार्गावरील ठाणेगावजवळ एक खाजगी बस पावसाच्या पाण्यात अडकली होती. तर गाढवी नदीच्या पुलाजवळ एस.टी महामंडळाची बस पाण्यातून जाताना बंद पडून सुमारे तीन फूट खोल पाण्यात अडकली. या दोन घटनांमध्ये एकूण 73 प्रवासी होते.
ही माहिती मिळताच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उषा चौधरी, पोलीस निरीक्षक कैलास गवते, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन बचावकार्य राबवले. प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादामुळे कोणालाही इजा झाली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. तसेच, त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था ठाणेगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करण्यात आली.