संवाददाता, चंद्रपूर: भारतीय हवामान खात्याने 25 जुलै 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी "रेड अलर्ट" जारी केला आहे. या दिवशी काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मोठा निर्णय घेतला आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30(2)(5) व (18) अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 25 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था — अंगणवाड्या, पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच सर्व खाजगी कोचिंग क्लासेस यांना एकदिवसीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे अतिवृष्टीमुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही. संभाव्य पुर, वाहतूक कोंडी, झाडे पडणे, विजेची अडचण अशा प्रकारच्या परिस्थिती टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. नितीन व्यवहारे यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, हवामान खात्याच्या सूचनांनुसार सतर्क राहावे, आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि कोणतीही आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक आहे: 07172-250077.
प्रशासनाकडून आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार असून, संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीनुसारच निर्णय घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.