![]() |
म्हपुरी तालुक्यात आज 10 जुलै ला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी |
भारतीय हवामान विभागाने गुरुवार, 10 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, प्रचंड पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे वैनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 30 (2) (5) व (18) नुसार खबरदारीचा उपाय म्हणून ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
या आदेशानुसार अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच खाजगी शिकवणी वर्ग गुरुवारी बंद राहतील. मात्र, ही सुट्टी केवळ ब्रम्हपुरी तालुक्यात लागू असून इतर तालुक्यांतील शैक्षणिक संस्थांवर ती लागू होणार नाही.
शाळा बंद असल्या तरी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजात सहकार्य करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
सदर आदेश फक्त ब्रम्हपुरी तालुक्यासाठी लागू राहील. जिल्ह्यातील अन्य तहसील क्षेत्रांतील शाळांना हा आदेश लागू होणार नाही. सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्कालीन व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.