चंद्रपूर:- जिल्ह्यातील नागभीड आणि मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा बळी गेला, ही अत्यंत दुर्देवी घटना आहे.
पहिली घटना, नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातील आलेवाही बिटमध्ये मारुती नथ्थू शेंडे (वय 63) हे त्यांच्या पत्नीसोबत तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पत्नीने धाडस दाखवत गावात पोहोचून लोकांना माहिती दिली. जेव्हा गावकरी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा मारुती यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांना तातडीने सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हे पण नक्की वाचा: पुन्हा वाघाचा हल्ला; जिल्ह्यात वाघाच्या हल्यात महिला ठार
दुसरी घटना, मूल तालुक्यातील भांदुर्णी गावातील ऋषी झुंगाजी पेंदोर (वय 70) हे 17 मे रोजी त्यांच्या बकऱ्यांसाठी चारा आणायला जंगलात गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला आणि वन विभागाला याची माहिती दिली. 18 मे रोजी वन विभागाने शोध घेतला असता, ऋषी पेंदोर यांच्या शरीराचे अवशेष आढळले. वाघाने त्यांचे संपूर्ण शरीर खाल्ले होते, फक्त डोक्याचा भाग आणि हात शिल्लक होते.
हे पण नक्की वाचा: वाघाच्या हल्ल्यात तीन महिला जागीच ठार
या दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वन विभागाने या घटनांची गंभीर दखल घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत.