चंद्रपूर:- जिल्ह्यात वाघाच्या हल्याचा हाहाकार सुरूच असून आज बुधवारी (14 मे) सलग चौथ्या दिवशी पुनः चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रामधील करबडा येथील कक्ष क्र. 862 मध्ये तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केल्याची थरारक घटना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. मृतक महिलेचे नाव कचराबाई अरुण भरडे (54) रा . करबडा असे आहे. जिल्ह्यात वाघाच्या हल्यात चार दिवसातील आजचा सहावा बळी आहे.
चिमूर तालुक्यात सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू असून ग्रामीण भागातील कुटुंबीय आपला संसार चालविण्यासाठी तेंदुपत्ता तोडण्यासाठी जात आहे. आज बुधवारी कचराबाई अरुण भरडे ही महिला आपल्या पती सोबत सकाळी आठ वाजताच्या सुमारास गावाशेजारील चौधरी यांच्या शेतीला लागूनच असलेल्या जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. तेंदुपत्ता तोडत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला केला,तेव्हा महिला ओरडली. ओरडण्याच्या आवाजाने घटना पतीच्या लक्षात आली.
हे पण नक्की वाचा: वाघाच्या हल्ल्यात तीन महिला जागीच ठार
पतीने बघितले तेव्हा वाघ त्या महिलेला तोंडात पकडून फरफटत नेत असताना दिसून आले. लगेच गावात जाऊन नागरिकांना या घटनेची माहिती दिली. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा कचराबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जंगलात पडून होता.