चंद्रपूर : जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील मेंन्ढा (माल) गावाशेजारच्या जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा बळी घेणाऱ्या वाघीणला सोमवारी म्हणजे 12 मे ला अंदाजे 12 वाजताच्या सुमारास बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.
मृतक महिलांमध्ये सासू-सुनेचा समावेश, कांता बुधाजी चौधरी (65-सासू), शुभांगी मनोज चौधरी (28-सून) आणि रेखा शालिक शेंडे (50) अशी मृतक महिलांची नावं आहेत. सर्व मृतक मेंढा-माल येथील रहिवासी, वनविभागाने मौका पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्ट मॉर्टमसाठी सिंदेवाहीला रवाना करण्यात आले.
हे पण नक्की वाचा: वाघाच्या हल्ल्यात तीन महिला जागीच ठार
एकाच वेळी एकाच गावातील तिघींना वाघाने ठार केल्याची पहिलीच घटना उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले ग्रामस्थांनी तात्काळ वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने 62 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला व जंगल परिसरात त्वरीत ट्रॅप कॅमेरा व लाईव्ह कॅमेरा लावण्यात आले.
सोमावरी सकाळपासून या वाघिणीची शोध मोहीम सुरू होती. अखेर आज,सोमवार 12मे रोजी सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या नेतृत्वात डोंगरगाव नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक-1360 मध्ये पोलीस दलाचे शॉर्प शुटर अजय मराठे यांनी अचूक निशाणा साधत वाघिणीला डार्ट मारीत बेशुद्ध करून जेरबंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. वाघिणीच्या बछड्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली असून लवकरच बछडे ताब्यात घेण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक एम.बी.चोपडे (प्रादेशिक
व वन्यजीव) ब्रम्हपुरी वनविभाग,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे,अजय मराठे, बायोलॉजीस्ट राकेश आहुजा उपस्थित झाले.