गडचिरोली (Gadchiroli):- गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात असलेले भामरागड तालुक्यातील कवंडे पोलीस स्टेशन हद्दीत (आज) 12 मे रोजी पोलिस आणि नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी नक्षल्यांचे शिबिर उदध्वस्त करीत त्यांच्याकडील बंदुका व अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे. या चकमकीत काही नक्षली जखमी झाल्याचे अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात नव्याने झालेल्या कवंडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत भामरागड दलमच्या नक्षल्याचे शिबिर असल्याची माहिती रविवारी (ता.11) दुपारी पोलिसांना मिळाली. त्यानंतर संध्याकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या नेतृत्वात सी-60 पथकाच्या दोनशे जवानांनी त्या परिसरात नक्षल शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती.
आज सकाळी नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर देत नक्षल्यांचा हल्ला परतवून लावला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता, मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य आढळून आले. पोलिसांनी नक्षल्यांकडील एक इन्सास, एक रायफल, एक मॅगेझिन, काडतुसे, डिटोनेटर्स, 3 पिट्टू, चार्जर, पुस्तके व अन्य साहित्य ताब्यात घेतले. या चकमकीत काही नक्षली ठार व जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.