गडचिरोली (कोरची ) :- पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य समस्या किती बिकट असते; याचे भयान चित्र एकदा पुन्हा एकदा समोर आले आहे. रस्ते नसल्याने येथे नेहमीच समस्या असते.आरोग्य सेवा देखील पोहचू शकत नसल्याने रुग्णांना पायपीट करत यावे लागत असते. त्यानुसार गरोदर महिलेला उपचारासाठी नेण्यासाठी खाटेवर घेऊन तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे धक्कदायक चित्र जिल्ह्यात पुन्हा एकदा पाहण्यास मिळत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून पासुन 20 किलोमीटर अंतरावरील असलेल्या केरामीटोला येथील गरोदर महिला रोशनी शामसाय कमरो हिला खाटेवर उचलून तब्बल तीन किलोमीटर अंतर पार करत रुग्णालय गाठावे लागले. त्या महिलेला आधी चर्वीदंड येथे नेण्यात आले. मात्र रस्ता नसल्यामुळे पाण्याने भरलेला नाला पार करावा लागला.चर्वीदंड येथून एका खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे तपासणी करून गडचिरोलीला रेफर करावे लागले.
या प्रकारामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य,रस्ते यांचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावे लागत आहे. ग्रामीण भागात रस्त्या अभावी नागरिकांच्या जीवाशी खेळ चाललाय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.