वडसा (गडचिरोली) :- वडसा तालुक्यातील अरततोंडी (जुनी) येथे उन्हाळी धान पीक कापणी करताना एका शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर आघात झाला आहे.ही घटना काल, १९ मे रोजी सकाळी साडेसात वाजता घडली.
चंद्रसेन धांडे वय ५० वर्षे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.ते मूळचे चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) गावचे असून त्यांची शेती अरततोंडीत आहे.जेमतेम दोन एकर जमिनीत धान पीक घेऊन ते उदरनिर्वाह करीत होते.काल,१९ मे रोजी सकाळीच ते पत्नीसमवेत धान काढण्यासाठी शेतावर गेले होते. धान कापणी करत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली.ते जमिनीवर कोसळले अन् क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान,कुटुंबियांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेले पण तोपर्यंत उशीर झाला होता.मृत्यूचे नेमके कारण कळले नसले तरी तीव्र हृदयविकाराचा झटका किंवा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वडसा पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दुपारी ४ वाजता त्यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.चंद्रसेन धांडे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने पत्नी व मुलांचा आधार हरवला आहे.