वडसा (गडचिरोली) :- वडसा तालुक्याच्या पूर्वेस कुरखेडा मार्गे 14 किलोमिटर अंतरावर असलेल्या कसारी फाट्या नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज,शुक्रवार दिनांक- 17 मे रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार,अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव कैलास मधुकर नाकाडे,वय अंदाजे 45 रा.बोळधा, ता.वडसा , जिल्हा- गडचिरोली असे आहे. वडसा -कुरखेडा मार्गावरून नेहमी सुसाट वेगाने वाहने जात असतात. यामध्ये अवजड वाहने,दुचाकी,चारचाकी वाहनांचा समावेश होतो. अशातच आज कसारी फाट्या नजिक गावातील काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला दुचाकी पडलेल्या अवस्थेत तसेच कैलास नाकाडे हे रक्त बंबाळ अवस्थेत झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. काही नागरिकांनी जवळ जाऊन बघितले असता कैलासच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे व डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे घटनास्थळी दिसून आले. घटनेची माहिती वडसा पोलीस प्रशासनास देण्यात आली. लगेच वडसा पोलिसांनी घटनास्थळ गाठून नाकाडे यांचे शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वडसा येथे पाठविण्यात आले. परंतु नेमका अपघात कशामुळे झालाय? हे अजून पर्यंत कळले नाही.
Read Also: वडसा: अनियंत्रित वाहनामुळे मोठा अपघात; तरुण जागीच ठार
मात्र,सदर घटनेवरून अज्ञात वाहन धडक देऊन प्रसार झाला असावा; असा कयास वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास वडसा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वडसा पोलीस करीत आहे.