आरमोरी (गडचिरोली): गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात बुधवारी, १५ मे रोजी रात्री १० ते ११ च्या सुमारास, 'जियेंगे तो एकसाथ; मरेंगे तो दोनो साथ' अशा आणाभाका घेतलेल्या प्रियकर-प्रेयसीने एकाच वेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला. यात प्रियकराचा मृत्यू झाला तर प्रेयसीचे पाय जमिनीवर लागल्याने प्रेयसी बेशुद्ध झाली आणि थोडक्यात बचावली. ही घटना गुरुवारी, १६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रियकर राहुल गजानन सावसागडे (वय २०, रा. शिवाजी चौक, आरमोरी) व प्रेयसी हे दोघेही आरमोरी तहसील कार्यालयाच्या मागील बर्डी परिसरातील भाड्याच्या खोलीत १५ मे रोजी एकत्रित आले होते. मात्र, ते कशासाठी आले होते हे अजूनही स्पष्ट नाही. त्याच रात्री १० ते ११ च्या सुमारास शहरात दोघांनी गळफास घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. कुणी गळफास घेतला हे माहीत नसल्याने अनेकांनी चुप्पी साधण्याचा प्रयत्न केला.
आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता, दोघेही एका दोरीने गळफास घेतलेले दिसले. यात राहुलचा मृत्यू झाला, तर प्रेयसीचे पाय जमिनीवर लागल्याने प्रेयसी बेशुद्ध झाली व थोडक्यात बचावली. प्रेयसीची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी ब्रम्हपुरी येथे हलवण्यात आले आहे.
सध्या आरमोरी शहर अवैध धंद्यांचे माहेरघर बनले आहे. अवैध दारू विक्री, सट्टा-पट्टी, तंबाखू विक्री आणि इतर धंदे येथे चालतात. या प्रकारांवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी शहानिशा न करता भाड्याने खोली दिल्या जातात, अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
प्रियकर-प्रेयसीने एकाचवेळी गळफास घेतल्याने शंका-कुशंकांना वाव मिळाला आहे. आत्महत्येमागचे कारण अजूनही गुलदस्त्यात असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.