नागपूर:- एका तरुणीचे दोन युवकांशी प्रेमसंबंध होते. पहिल्या प्रियकराने तरुणीला मारहाण करीत तिचा मोबाईल फोडला. त्यामुळे चिडलेल्या तिच्या दुसऱ्या प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने पहिल्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून केला.
ही थरारक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास वाठोड्यात घडली. रवी गरीबा साव (२७, डब्ल्यूसीएल कॉलनी, सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी तीनही आरोपींनी अटक केली.
रवी साव हा खासगी काम करतो आणि त्याचे सक्करदरा परीसरातील १६ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध आहेत. ती मुलगी अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून तिचे आरोपी आवेश मिर्झा बेग रहमत बेग (आदर्शनगर, नंदनवन) याच्याशी प्रेमसंबंध आहे. दोन्ही तरुणांशी तिचे प्रेमसंबंध असल्याने दोघांकडून नेहमी भेटवस्तू घेत होती.
रवीने तिला मोबाईल भेट दिला होता. मात्र, तिचा मोबाईल नेहमी व्यस्त दिसत असल्याने त्याला संशय आला. त्याला आवेश बेग या युवकाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी रवीने प्रेयसीला मारहाण केली आणि तिचा मोबाईल फोडला. नाराज झालेल्या मुलीने आपला दुसरा प्रियकर आवेशला ही बाब सांगितली. त्याचा पारा चढला आणि त्याने रवीचा काटा काढण्याचा कट रचला.
बुधवारी रात्रीला आवेशने रवीला फोन करून पांढुर्णाजवळ भेटायला बोलावले. आरोपी आवेश आणि साथीदार कुणाल खळतकर आणि आयुष पेठे हे तेथे पोहचले. काही वेळात रवीसुद्धा तेथे पोहचला. आरोपींनी रवीला कारमध्ये कोंबले आणि आऊटर रिंगरोडवर घेऊन गेले. प्रेयसीला मारहाण केल्याबाबत आवेशने जाब विचारला. शारीरिक संबंधासाठी नकार दिल्याचे कारण सांगताच आवेश चिडला. तिघांनीही रवीवर चाकूने सपासप वार करीत जागीच ठार केले. शेतात रविचा मृतदेह फेकून आरोपींनी पळ काढला. गुरुवारी सकाळी रवीचा मृतदेह पांढुर्णा येथील सरपंच व पोलीस पाटील यांना दिसला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अवघ्या चार तासात तिनही आरोपींना अटक केली.
गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्थानिक नागरिकांना शेतात मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिस घटनास्थळावर पोहोचले. मृतदेहाजवळ पोलिसांना एक मोबाईल फोन मिळाला. यावरून रवीची ओळख पटली. पोलिसांनी त्याची बहीण नेहा हिच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. नेहाने पोलिसांना सांगितले की, तरुणीशी संबंधावरून रवीचा आवेश याच्याशी वाद सुरू होता. या माहितीवरून पोलिसांनी आवेश आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी प्रेम प्रकरणातून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांनाही अटक केली.