आरमोरी : मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणार्यांना एक चपराक देणारी घटना चिखली गावात घडली आहे. मुलगा नसलेल्या वडिलांना चारही मुलींनीच खांदा देत अंत्यसंस्कार केले आहे. अलिकडे मुलगी हे परक्याचे धन समजले जात असल्याने दुय्यम वागणूक दिली जाते. मात्र देसाईगंज तालुक्यातील चिखली रीठ येथील बाबुराव मडावी यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या चार मुली पुढे सरसावल्या. त्यांनी मृतदेहाच्या तिरडीला खांदा देत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. मुलींनी आपल्या आईचाही सांभाळ करण्याची शपथ अंत्यसंस्कारप्रसंगी घेतली. त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. आजही जन्मदात्या वडिलांच्या पार्थिवाला मुलानेच खांदा देण्याची भारतात प्रथा आहे. मात्र या प्रथेला छेद देणारी घटना देसाईगंज तालुक्यातील चिखली गावात घडली.
चिखली रीठ येथील रहिवासी बाबुराव आणि केमाबाई याचा सर्वसाधारण परिवार. काबाडकष्ट करणार्या बाबुराव यांनी उत्तरा, अनुताई, ललीता, आणि निराशा या चार मुलींना मोठं करून शिक्षण व संगोपण केले. एका एकर जबरान शेती कसुन चारही मुलीचे लग्न केले. मात्र कष्ट झेपत नसल्याने 80 पार केलेल्या आपल्या आई-वडीलांचा सांभाळ या चारही मुली करीत होत्या. गेल्या एक वर्षापासून आजारी वडीलांची अत्यंत गरीब परिस्थिती अशाच परिस्थितीत चार मुलीच्या लग्नाचा कर्जाचा बोजा देतादेता पुणता दिवाळा उडत असताना घराची संपूर्ण जबाबदारी आता या चारही मुलींच्याच खांद्यावर होती. दरम्यान वयाच्या 80 व्या वर्षी बाबूराव यांचे आजारपणामुळे बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अखेर मुलींनीच तिरडीला खांदा देऊन अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. अंत्यसंस्काराचे दृश्य पाहून लोकांच्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. या घटनेनेने मुलगा, मुलगी असा भेद करणार्यांना मात्र चांगलाच चपराक बसली आहे. याची माहिती होताच श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेच्यावतीने मृतक बाबुराव मडावी यांच्या कुटूंबीयांना अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष शेषराव कुमरे, सचिव गिरीधर नेवारे, संचालक धर्मराज मरापा, गोपाल खरकाटे, दिवाकर राऊत उपस्थित होते.