भामरागड: तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरीतील तिहेरी हत्याकांडाने जिल्हा एकदा पुन्हा हादरला आहे. गुंडापुरीतील वृद्ध आजी-आजोबा आणि नातीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना 7-8 ला म्हणजेच गुरुवारी उघडकीस आली. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून, पोलिसांनी त्यादृष्टीने तपास चक्रे तीव्र केली आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे दोन महिन्यांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागावात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती. आता एकदा पुन्हा असच स्वरूप समोर आल आहे. गुंडापुरीतील आजी-आजोबा आणि नातीच्या तिहेरी हत्याकांडाने जिल्हा पुन्हा हादरला आहे.
- अर्चना रमशे तलांडे (१०) रा. येरकल, ता. एटापल्ली
- देवू दसरू कुमोटी (६०) रा. मरकल ता. एटापल्ली
- बिच्चे देवू कुमोटी ५५) रा. गुंडापुरी, ता. भामरागड
अशी मयतांची नावे आहेत. देवू कुमोटी यांची मुलगी मरकल ता. एटापल्ली येथे राहते. चौथीत शिकणारी तिची कन्या अर्चना तलांडे ही दिवाळीच्या सुट्टीत आजी-आजोबांकडे आली होती.
हत्येमागे नक्षली कनेक्शन?
जिल्ह्यात सध्या नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरू आहे. या पार्श्वभूमीवर १८ दिवसांत चौघांची हत्या झाली आहे. त्यातच गुंडापुरीत गळा चिरलेले तिघांचे मृतदेह घरात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, ही घटना नक्षल्यांशी संबंधित नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा अंदाज आहे.
सदर घटना वैयक्तिक संपत्तीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. योग्य तो तपास करून आरोपींना जेरबंद केले जाईल. – नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली