गडचिरोली (मुलचेरा) : जिल्ह्यात सध्या वाघ आणि रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. गडचिरोलीच्या उत्तर भागात या दोन्ही प्राण्यांमुळे नागरिक सध्या भयभीत झाली असतानाच दक्षिण भागात सुद्धा वाघांची दहशत बघायला मिळत आहे. शेतात काम करणारे शेतकरी आणि मजूरवर्ग दर दिवसाला वाघाच्या दहशतीखाली काम करत आहेत. गुरुवारी सकाळच्या सुमारास एका शेतकऱ्यावर शेतात काम करीत असताना वाघाने असाच हल्ला केला. मात्र, त्या ६५ वर्षीय धाडसी शेतकऱ्याने मोठ्या हिमतीने या वाघाचा प्रतिकार करुन त्याला परतावून लावला. रंजित कुटेश्वर मंडल (रा. विश्वनाथनगर, ता. मुलचेरा) असं त्या शेतकऱ्याचे नाव असून वाघासोबत झुंज देताना ते जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे उपचार सुरू आहेत.
वनविभाग व वनविकास महामंडळातर्फे तालुक्यातील गावात बॅनर लावत वाघापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तर जंगलात वनविभागाने ट्रॅपिंग कॅमेरे बसवून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवली होती. असे असले तरी वाघ तालुका मुख्यालय जवळील विविध गावांच्या शेतशिवारात भ्रमण करून माणसांना व पाळीव प्राण्यांना भक्ष्य व जखमी करत आहे. त्यामुळे मुलचेरा तालुक्यात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.अशा घटनांमुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून शेतीचे कामे ठप्प झाली आहेत.
शेतकऱ्यांसोबतच शालेय विद्यार्थीही भयभीत झाले आहे. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.