चंद्रपूर:- व्यसानाच्या आहारी गेलेल्या आणि नेहमी दारू पिऊन घरात नेहमी भांडण करणाऱ्या पतीला, पत्नी, मुलगी व साळ्याने आज (दि. २४) विजयादशमीच्या दिवशी जबर मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. शहरातील नगीनाबाग मध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी पत्नी, मुलगी व साळ्याला अटक केली आहे. नीलकंठ चौधरी (वय ५२) असे मृतक पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील नगिना बाग मध्ये ५२ वर्षीय निलकंठ चौधरी हा राहत होता. त्याच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे. मोलमजुरीचे काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होता. त्याला पत्नी मदत करीत होती. परंतु पत्नी निलकंठ हा व्यसनाच्या आहारी गेला होता. तो नियमित दारू प्राशन करायचा आणि घरात येऊन पत्नी सोबत विविध कारणांवरून भांडण करायचा. पत्नीकडे मंडळी आली की त्यांना शिविगाळ करून हाकलून लावायचा. आज विजयादशमीच्या दिवशी बहिणीला भेटण्याकरीता मुल तालुक्यातून सुशी दाबगाव येथून भाऊ विलास शेंडे हा आला होता. दम्यान तो घरी दिसताच निलंकठने साळ्याला अश्लिल भाषेत शिविगाळ सुरू केली. त्यामुळे भांडण सुरू झाले. भांडण वाढत गेल्याने त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. नेहमीच घरात भांडण करणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळून संतापलेली पत्नी मंगला व मुलगी व साळ्याने लोखंडी रॉड, बांबूने त्याचे डोक्यावर जबर मारहाण केल्याने पतीचा घटनास्थळी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला.
रामनगर पोलीस ठाण्यात भांदवी 302 अन्वये गुन्हा दाखल करून पत्नी मंगला चौधरी, मुलगी व साळा विलास शेंडे यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहे.