Ex Lover Murder: नवीन प्रियकर बनला सर्वस्व अन... प्रेयसीने जुन्याला संपविले | Batmi Express

Gadchiroli News,Aheri,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Crime,Gadchiroli Suicide,

Aheri,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Crime,Gadchiroli Suicide,

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील आलापल्लीतील गोंडमोहल्ला येथे एका तरुणाचा मृतदेह चिखलात माखलेला आढळल्याने २९ ऑक्टोबरला खळबळ उडाली होती. अहेरी पोलिसांनी तपासचक्रे गतीने फिरवून २४ तासांत या गुन्ह्याचा उलगडा केला.

प्रेमाच्या त्रिकोणातून खुनाची थरार कथा घडल्याचे तपासात समोर आले. नव्या प्रियकराच्या घरी गुलछर्रे उडविताना प्रेयसीला पकडल्यावर वाद झाला, त्याचे पर्यवसान जुन्या प्रियकराच्या खुनात झाले. याप्रकरणी ३० ऑक्टोबरला प्रेयसीसह नव्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

माहितीनुसार, राकेश फुलचंद कन्नाके (३५) रा. श्रमीकनगर, आलापल्ली असे मृताचे नाव आहे. सचिन लक्ष्मण मिसाळ (३५) रा.गोंड मोहल्ला, आलापल्ली व शालिनी म्हस्के (३२) रा. गणेश मंदिर परिसर, आलापल्ली या दोघांचा आरोपींत समावेश आहे. राकेश कन्नाके हा मजुरीकाम करायचा. त्याच्या डोक्याला डाव्या डोळ्यावर व कपाळावर गंभीर जखम आढळल्याने घातपाताच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला.

राकेश व शालिनीचे गेल्या नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कुणकुण पोलिसांना लागली, त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा वळवली. अधिक तपासात शालिनीच्या आयुष्यात दोन वर्षांपासून सचिन मिसाळ या नव्या प्रियकराची एंट्री झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे राकेश व शालिनीच्या नात्यातही कटुता निर्माण झाली होती. शालिनीचे सचिनला भेटणे राकेशला आवडत नव्हते. यातून त्या तिघांत किरकोळ वादही झाले होते. शालिनी कोठे जाते, काय करते, यावर राकेश अलीकडे बारकाईने लक्ष ठेऊन असायचा.

डाेक्यावर जखमा, पाय माेडलेला : आलापल्लीत आढळला युवकाचा मृतदेह


२८ ऑक्टोबरला सचिन मिसाळचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते, त्याला भेटण्यासाठी शालिनी रात्री त्याच्या घरी आली. तिच्यावर पाळत ठेऊन असलेल्या राकेश कन्नाके हा देखील तिच्या मागोमाग सचिन मिसाळच्या घरी पोहोचला. यावेळी तिघांमध्ये वाद झाला. राकेश शालिनीला तेथून माझ्यासोबत चल असे म्हणत होता तर सचिन व शालिनी त्याला येथून निघून जा, असे सांगत होता. शाब्दीक चकमकीनंतर तिघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. या भांडणात राकेशला सचिन व शालिनीने जोराचा धक्का दिला आणि तो सचिनच्या घरासमोर असलेल्या ग्रामपंचायतच्या नालीवर पडला. यात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. एवढ्यावर सचिन शांत झाला नाही, त्याने लाकडाने त्यास मारहाण केली. घाव वर्मी बसल्याने तो बेशुद्ध पडला. त्यानंतर शालिनी म्हस्के ही सचिन मिसाळसोबत त्याच्या घरी गेली. मात्र, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला व तपासात दोघांचाही भंडाफाेड झाला.

हेही वाचासाई मंदिर परिसरात आढळला मृतदेह

रविवारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. अहेरीचे पो.नि. मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक बालाजी सोनुने, संतोष मरस्कोल्हे, हवालदार किशोर बांबोळे,अंमलदार संजय चव्हाण यांनी आरोपींना जेरबंद केले. अधिक तपास सुरू असल्याचे पोनि. मनोज काळबांडे यांनी सांगितले.

मृत्यू झाल्याचे पाहून हादरले, विल्हेवाट लावण्यासाठी चिखलात फेकले –


दरम्यान, या घटनेनंतर तासाभराने सचिन मिसाळ व शालिनी म्हस्के यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता राकेश कन्नाके मृत झाल्याचे आढळले. त्यामुळे दोघेही हादरले. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सचिनने राकेशचा मृतदेह उचलून चिखलात फेकला. नंतर दोघेही आपापल्या घरी निघून गेले.

तिघेही विवाहित पण प्रेमानेच केला घात –


या घटनेतील मृत राकेश कन्नाके विवाहित होता. आरोपी सचिन मिसाळ व शालिनी म्हस्के यांचाही विवाह झालेला आहे. राकेशला चार वर्षांची मुलगी आहे. शालिनी एक मुलगा व एक मुलगी अशा दोन लेकरांची आई आहे. सचिनलाही मुलगा आहे. प्रेमात भरकटले अन् त्यांच्या आयुष्याची दैना झाली. राकेशने जिच्यावर जीवापाड प्रेम केले त्याच प्रेयसीने त्यास संपविले, तर प्रेयसीसाठी खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात तुरुंगाची हवा खाण्याची वेळ सचिन मिसाळवर आली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.