चंद्रपूर:- मूल तालुक्यातील पुनर्वसित भगवानपूर येथे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट देवून येथील मूलभूत सोयीसुविधांची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी गावक-यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला.
भद्रावती तालुक्यातील बोटेझरी व चंद्रपूर तालुक्यातील कोळसा येथून प्रकल्पबाधित नागरिकांचे सन 2007 व 2012 अशा 2 टप्प्यांमध्ये मुल तालुक्यातील भगवानपूर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथील पुनर्वसित नागरिकांना पुरविण्यात आलेल्या मूलभूत सोयीसुविधांबाबत त्यांनी गावक-यांचे म्हणणे ऐकून घेतले. गावातील नागरिकांना योग्यरीत्या जनसुविधांचा लाभ मिळावा, याबाबत त्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या. त्यामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, समाजमंदिर, पाणंद रस्ते, शहरांना जोडणारे रस्ते, तलावाचे काम, भोगवटादार वर्ग 2 जमिनींचे वर्ग 1 मध्ये रुपांतर करणे, इत्यादी कामांबाबत जिल्ह्याधिका-यांनी निर्देश दिले..
जिल्हाधिका-यांचा विद्यार्थ्यांशी संवाद : यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी जि. प. प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच शाळेमधील विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ, नायक, शिक्षणमंत्री, इ. कसे वर्गावर नियंत्रण ठेवतात व वेगवेगळे उपक्रम राबवतात, हे जाणून घेतले. सोबतच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे पोषण आहार, पाणी सुविधा, संरक्षण भिंत, मैदान याबद्दल माहिती घेतली.
शिबिराच्या माध्यमातून लाभ द्या: मौजा भगवानपूर येथे तहसील कार्यालय मुल, चंद्रपूर, भद्रावती व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, चंद्रपूरतर्फे आयोजित केलेल्या शिबिरामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना आदिवासी शबरी घरकुल आवास योजना तसेच उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदीबाबत लाभ द्यावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
यावेळी मुलचे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, गट विकास अधिकारी बी. एच. राठोड, वन परिक्षेत्र अधिकारी, भगवानपूरचे सरपंच व गावकरी उपस्थित होते.