आमगाव : गोरठा येथील गणेशोत्सवात गणपतीच्या भोजन कार्यक्रमाला जात असलेल्या मोटारसायकलला भरधाव ट्रकने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता आमगाव-गोंदिया मार्गावरील गोरठाजवळ घडली.
आमगाव तालुक्यातील गिरौला येथील बिसेन कुटुंबीय गणपतीच्या जेवणासाठी मोटारसायकलवरून (क्र. एमएच ३५ एम ७५६५) ट्रिपल सीट जात होते. गोरठा येथील कालव्याजवळ आमगावकडून गोंदियाकडे धावणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. एमएच ३५ एजे १०२१) त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान गोंदियाच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला
. सुनीता सूरजलाल बिसेन (४५), व सत्यशीला ब्रिजलाल बिसेन (३५, दोन्ही रा. वॉर्ड क्रमांक ३, गिरोला) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुचाकीचालक दीपक सूरजलाल बिसेन (२२) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी गोंदियाच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान २९ सप्टेंबरच्या पहाटे १ वाजता त्याचा मृत्यू झाला. सौरभ शालिकराम मुंडे (२५, रा. बनगाव) यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी आरोपी ट्रकचालक मोरेश्वर सहसराम बोरसरे (४४, रा. कुंभार चौक घोटी, ता. गोरेगाव) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३८, ३०४ (अ) सहकलम (१३४ (अ) (ब), १८४ मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक धायगुडे करीत आहेत.