
जळगाव:- धोंड्यासाठी माहेरी आलेल्या मुलीचा तिच्या आई बरोबर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घराच्या छतावरून लोखंडी रॉडने पेरू तोडताना उच्च दाबाच्या वीजवाहिनीच्या धक्क्याने मायलेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.मीना हनुमंत सोनवणे (वय ४५), आकांक्षा राहुल रणशूर (२५) असे मृत्युमुखी पडलेल्या मायलेकीची नावे आहेत. या घटनेत राहुल रणशूर आणि त्यांच्या दोन मुलांनाही विजेचा धक्का बसला. मात्र, ते लांब फेकल्याने थोडक्यात बचावले. ओझर येथील दत्तनगर वसाहतीत ही घटना घडली. अधिक मासानिमित्त गोंडेगाव (ता. निफाड) येथील मुलगी आकांक्षा ही पती राहुल रणशूर आणि दोन मुलांसह ओझर येथे आई मीना सोनवणे यांच्याकडे आली होती.
हे देखील वाचा:
सोनवणे कुटुंब दत्तनगर वसाहतीत भाड्याने राहत होते. घराच्या गच्चीवरून पेरू तोडत असताना हातातील रॉड उच्च दाबाच्या वायरीला लागल्याने मीना सोनवणे, आकांक्षा रणशूर या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. या वेळी गच्चीवरील पाण्याची टाकी फुटल्याने पूर्ण बंगल्यात वीजप्रवाह उतरला होता. ओझर पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पिंपळगाव बसवंत येथे पाठवले आहेत. ओझरचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी तपास करीत आहेत.
अधिक मासानिमित्त मुलगी आकांक्षा पती आणि मुलांसह शनिवारी ओझर येथे आले होते. त्यांनी रविवारी दुपारी सगळी खरेदी केल्यानंतर घरी आल्यावर दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली. आकांक्षाच्या मागे पती, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. सोनवणे परिवाराची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मीना सोनवणे घर सांभाळून दुकानात काम करायच्या, तर पती ट्रेडिंग कंपनीत काम करायचे. सोनवणे यांच्या मागे पती, दोन मुल असा परिवार आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.