गोंदिया तालुक्यातील पूर प्रवण पूजारीटोला, कासा, ब्राह्मणटोला गावातील जुन्या पुनर्वसनाच्या निकषानुसार चिन्हित ५३ कुटुंबाचे पुनर्वसन आता शासनाच्या १४ ऑक्टोबर २०२२ च्या नवीन शासन निर्णयातील तरतुदीनुसार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यासाठी जिल्हा प्रशासन पुढाकार घेणार असून यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. शासनाच्या नव्या पुनर्वसन धोरणाचे नागरिकांनी सुद्धा अवलोकन करावे. प्रशासन आपल्या सोबत आहे असा विश्वास जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी ग्रामस्थांना दिला.
जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी पूर प्रवण गावांची भौगोलिक परिस्थिती पाहण्याकरिता गोंदिया तालुक्यातील कोरणी घाट, रजेगाव, बिरसोला, कासा, काटी, पुजारीटोला व तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा, किडंगीपार, ढिवरटोला या गावांना भेट देवून स्थानिक लोकांशी संवाद साधला.
कासा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.