चंद्रपूर:- चंद्रपूरला जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. त्यामुळे नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं एक जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. मागिल आठ दिवसांपासून जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. याचा फटका देखील रस्ते वाहतुकीला बसला आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यानं २०० ते ३०० जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित देखील करण्यात येत आहे. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. मात्र,पोंभुर्णा आक्सापूर मार्गावर मोठी दुर्घटना समोर आली आहे. आज पोंभुर्णा आक्सापूर मार्गावर असलेल्या बेरडी नाल्यात कार वाहून गेली. एक किलोमीटर अंतरावर ही कार सापडली पण कारचालक बेपत्ता आहे. अमित गेडाम असे कारचालकाचे नाव आहे. पोंभुर्णा येथील तहसील कार्यालयात पुरवठा सहाय्यक म्हणून गेडाम कार्यरत होते. गोंडपिपरीच्या शासकीय गोदामाचा त्यांच्याकडे प्रभार आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस गेडाम यांचा शोध घेत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील नदी, नाले पुन्हा ओसंडून वाहत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागाला या पुराच्या मोठा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्हातील १८ महत्त्वाचे मार्ग पुरामुळे बंद पडले आहेत. काही गावांना पुराने वेढा दिला आहे.
पोंभुर्णा तहसील कार्यालयात पुरवठा सहायक पदावर कार्यरत असलेले अमित गेडाम आज (शुक्रवार)महत्त्वाच्या कामानिमित्याने पोंभुर्णा येथून गोंडपिपरीकडे निघाले होते. बेरडी नाल्याला आलेल्या पुराच्या त्यांना अंदाज आला नाही. त्यांनी पुरातून कार नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने कार वाहून गेली. जवळपास एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बंधाऱ्यावर कार अडकली. मात्र अडकलेल्या कारमध्ये गेडाम नव्हते. घटनेची माहिती गोंडपिपरी पोंभुर्णा पोलीस विभागाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांकडून गेडाम यांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.