प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ | Batmi Express

प्रधानमंत्री पीक विमा,Pradhan Mantri Crop Insurance,Crop Insurance,पीक विमा,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,

 

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur News IN Marathi,

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रावर केंद्रीय कृषी विभागाचा निर्णय

चंद्रपूर, दि. 31 : गत आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला तर विद्युत, इंटरनेट सेवा खंडीत झाली होती. त्यामुळे शेतक-यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी वेळेत नोंदणी करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात घेत राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कृषी सचिवांना पत्र लिहिले. या पत्राची दखल घेऊन, प्रधानमंत्री पीक विमा योजनेला आता 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची भरपाई या योजनेंतर्गत शेतक-यांना दिली जाते. त्यामुळे शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे शेतक-यांना 31 जुलैपर्यंत पीक विमा योजनेची नोंदणी करता येणार नाही, परिणामी अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय कृषी सचिव मनोज अहुजा यांना पत्र लिहिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीची मुदत किमान 15 दिवसांनी वाढवून शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती. त्यामुळे आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 3 ऑगस्टपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.         

यापूर्वी पीक विमा योजनेंतर्गत एकूण विमा हप्ता रकमेच्या 2 ते 5 टक्के रक्कम शेतक-यांना भरावी लागत होती. त्यामुळे बहुतांश शेतकरी या योजनेत सहभागी होत नव्हते. परिणामी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीत नुकसान झाल्यानंतरही शेतक-यांना मदतीपासून वंचित राहावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केवळ 1 रुपया प्रति अर्ज या नाममात्र दराने प्रधानमंत्री पीक विमा योजना 2023-24 सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खरीप 2023-24  या हंगामाकरीता तांदूळ, कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग व उडीद या अधिसुचित पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. 

हे देखील वाचा:

चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2023 करीता सदर योजना ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनी कडुन राबविण्यात येणार आहे. सदर विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800118485 असून ई-मेल [email protected] आहे.

अडचण आल्यास यांच्याशी करा संपर्क : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी करतांना शेतक-यांना काही अडचण आल्यास त्यांनी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या संबंधित तालुका समन्वयकांशी संपर्क करावा. सदर कंपनीचे जिल्हा समन्वयक प्रतीक करपेनवार (मो. 8080192076) असून देवानंद रोहनकर (तालुका समन्वयक, चंद्रपूर, मो. 9579808500), निलेश धोपटे (बल्लारपूर, मो. 9881545801), आशिष तुपट (ब्रम्हपुरी, मो. 9588608847), निहाल नागापुरे (सिंदेवाही, मो. 8459735371), रुपेश रोहणकर (मूल, मो. 7972564857), सुरज चौधरी (सावली, मो. 9579957562), तिलकराम चांदेकर (पोंभुर्णा, मो. 7378664440), संदीप बोगेवार (गोंडपिपरी, मो. 7448167282), अमन हजारे (भद्रावती, मो. 8237455338), अभिजीत गोगे (कोरपना, मो. 9022982158), तुषार चौधरी (वरोरा, मो. 8806066795), राकेश गट्टेवार (राजुरा, मो. 9423319383), चंद्रशेखर रेवतकर (चिमूर, मो. 9975026352), सुशांत निकोडे (नागभीड, मो. 8975704125) आणि कुणाल सिडाम (तालुका समन्वयक जिवती, मो. 7887374512) आहेत. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.