वडसा : एक महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह घरातील पाण्याच्या टाकीत आढळून आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील डोंगरगाव (ह.) येथे दोन महिन्यापूर्वी उघडकीस आली होती. सखोल तपासणी अंती वंशाच्या दिव्यासाठी निर्दयी मातापित्यांसह आजी आजोबांनी चिमुकलीला ठार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने देसाईगंज पोलिसांनी चौघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावित आरोपींची चंद्रपूर कारागृहात रवानगी केली आहे.
डोंगरगाव (ह.) येथील गोपीनाथ प्रधान यांच्या दोन्ही मुलांना मुली आहेत. या कुटूंबातील भास्कर गोपीनाथ प्रधान यांची पत्नी निशा ही तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. मार्च महिन्यात तिने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र दोन्ही मुलांना मुलीच असतांना निशालाही तिसऱ्यांदा मुलगी झाल्याने कुटूंब नाराज होते. 24 एप्रिल रोजी एक महिन्याच्या कुटूंबियांना संपविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान तिला घरातीलच पाण्याच्या टाकीत बुडवून ठार केले व पोलिसांना कोणतीही माहिती न देताच अंत्यसंकार केले होते. मात्र चिमुकलीला कुटूंबियांनी संपविल्याचा संशय पोलिसांना लागला. यावरुन पोलिसांनी अधिक चौकशी केली असता प्रधान कुटूंबियांनी मुलीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती दिली. अखेर दोन महिन्यानंतर पोलिसांनी या हत्ये प्रकरणी आई निशा, वडील भास्कर, आजी सुनीता व आजोबा गोपीनाथ प्रधान या चौघांनाही अटक केली. चारही आरोपींची चंद्रपूर कारागृहात रवानगी केली आहे.