गडचिरोली : पुरस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा सीमाक्षेत्रातील सर्व शाळा, विद्यालय, अंगणवाडी, महाविद्यालये 22 जुलै रोजी बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिले आहे. यापूर्वी 20 जुलै ला सुद्धा शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.सध्या मान्सून कालावधी सुरु असून मागील ५ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी झालेली आहे. गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती इ. नद्यांच्या पाण्याची पातळी ही वाढत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने बरेच अंतर्गत मार्ग बंद आहे. तसेच भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर व हैद्राबाद द्वारा आज २१ जुलै प्रसारित हवामान संदेशानुसार पुढील २४ तासाकरिता गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील तेलंगाणा राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित करुन मुसळधार पाऊसासह अत्याधिक पाऊसाची दाट शक्यता वर्तविली आहे. या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये २२ जुलै रोजी सर्व अंगणवाडी, शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली संजय मीणा यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत पूरपरिस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत उद्या 22 जुलै रोजी गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामधील सर्व शाळा, विद्यालये, अंगणवाडी, महाविद्यालये सदर कालावधीत बंद असतील तसेच सदरचे आदेश केवळ शाळा, विद्यालये, महाविद्यालये करिता लागू असून इतर सर्व कार्यालये, आस्थापना, दुकाने इत्यादींना सदरचे आदेश लागू नाही असे कळविले आहे.
आदेशाचे पालन न करणारी / उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
आदेशाचे पालन न करणारी / उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.