चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातपर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना बफर झोन मधील पर्यटन शुल्क वाढविण्याचा निर्णय ताडोबा व्यवस्थापनाने घेतला आहे. एक जुलै २०२३ पासून किमान १ हजार रुपये वाढ करण्यात येणार आहे. या दरवाढीने ताडोबात पर्यटन करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे.
दरवर्षी लाखो देशविदेशातील पर्यटक ताडोबा प्रकल्पाला भेट देतात. वाघ, बिबट, हरीण, चितळ, अस्वल, कोल्हा, नीलगाय यासोबतच इतर वन्य प्राण्यांच्या दर्शनाने पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र यापुढे पर्यटकांना थोडी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. पर्यटन शुल्कात वाढ करणार असून १ जुलै २०२३ पासून जिप्सीमध्ये सीट-शेअरिंग सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही एक जुलै २०२३ पासून ताडोबा कोर झोनचे सहा गेट बंद होणार आहेत. तीन महिने कोरमधील पर्यटन बंद राहील. पुन्हा १ ऑक्टोबरपासून खुले होतील.
अशी आहे पर्यटन दरवाढ :
एका प्रौढ व्यक्तीला यासाठी १ हजार ५०० रुपये द्यावे लागणार आहे. सिंगल बेंच ची किंमत चार हजार केली आहे. ज्यामध्ये दोन प्रौढ आणि मुले असे तीन व्यक्ती असतील. आठवड्याच्या दिवशी एकाच सफारीची किंमत ५ हजार १२५ रुपये असेल तर शनिवार व रविवार आणि सरकारी सुटीच्या दिवशी ६ हजार १२५ रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. यामध्ये १ हजार ७०० रुपये प्रवेश शुल्क आहे. २ हजार ७०० रुपये जिप्सी तर ६०० रुपये गाईड शुल्काचा समावेश असेल. वीकेंडला २ हजार ७०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले. पूर्वी आठवड्याच्या दिवशी एकाच सफारीची किंमत ४ हजार १२५ रुपये होती. वीकेंड आणि सरकारी सुटीचे शुल्क सारखे होते. गाईड व जिप्सी मालकांकडून शुल्क वाढवण्याची प्रलंबित मागणी होती.