चंद्रपूर: पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये | Batmi Express

Chandrapur Rain,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur Yellow Alert,agriculture,

Chandrapur Rain,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur Yellow Alert,agriculture,

चंद्रपूर, दि. 26 : कृषी हवामान व सल्ल्यानुसार चंद्रपूर जिल्हयामध्ये दिनांक 26 ते 28 जून 2023 पर्यंत आकाश ढगाळ राहून सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वातावरणातील बदलामुळे मॉन्सूनचे जिल्हयातील आगमन उशिराने झाले असले तरी शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्हयात चालू 2023-24 या खरीप हंगामात 4 लाख 90 हजार हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन केले आहे. यात प्रत्येकी 1 लाख 87 हजार हेक्टर भात पिक व कापूस तर 80 हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाचा पेरा राहील. हवामान विभागाच्या या अंदाजानुसार दि. 24 व 25 जूननंतर अरबी समुद्रवरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याने सर्वदूर चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात शेतक-यांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.

शेतक-यांनी पेरणीसाठी घाई करु नये, सर्वसामान्यतः शेतक-यांनी 80 ते 100 मि.मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. शासनाकडून महावेध प्रणालीमार्फत जिल्हयासाठी प्राप्त दैनिक पर्जन्यमान अहवालानुसार  वरोरा तालुक्यातील टेमुर्डा, खांबाडा, चिमूर तालुक्यातील खडसंगी, भिसी, मासळ, राजुरा तालुक्यातील विरुर स्टे. व कोरपना तालुक्यातील कोरपना व गडचांदूर याच महसूल मंडळामध्ये 75 ते 100 मिमी पर्यंत पर्जन्यमान झाल्याची नोंद असली तरी सलग तीन दिवस पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे या व इतर महसूल मंडळांतर्गत असलेल्या शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याची खात्री करुनच पेरणी करावी. उन्हामुळे तप्त झालेल्या शेतजमीनीतील ओलावा घटतो. त्यामुळे पावसाळयात किमान 75 ते 100 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाल्यानंतरच किंवा जमीन किमान सहा इंच ओली झाल्याची खात्री झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. जिल्हयात माहे जून महिन्याच्या 183.5 मिमी सरासरी पैकी दि. 26.06.23 पर्यंत 42.8 मिमी पर्जन्यमान झाले असून त्याची टक्केवारी 23.10 आहे. मागील वर्षात याच तारखेपर्यंत 78 मिमी पाऊस पडलेला होता.

असे करा पीक नियोजन : 1) शेतक-यांनी पेरणीसाठी घाई करु नये.  2) सर्वसामान्यतः शेतक-यांनी 80 ते 100 मि.मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. 3) शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. 4) मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करू नये. 5) पेरणी करताना साधारणपणे 20 टक्के जादा बियाणांचा वापर करावा. 6) सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. 7) पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने (बीबीएफ) पेरणी करावी. 8) जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादन (मल्चींग) सारख्या तंत्राचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.