भंडारा : जिल्ह्यात सोमवार सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान भंडारा तालुक्यातील वाघबोडी शिवारात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. सदर घटना वाघबोडी येथील तेजराम बडोले यांच्या शेतात दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
माहितीनुसार यादवराव अर्जुन शहारे (६५) रा. विद्यानगर भंडारा आणि रमेश श्रावण अंबादे (५२) अशी मृतकांची नावे आहेत. खरीप हंगाम अंतर्गत शेतात काग सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. यावेळी या दोन्ही मजुरांनी पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातीलच एका मोठ्या झाडाचा आधार घेतला. याचवेळी झाडावर वीज कोसळली. यात दोन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला.