आरमोरी (6/30/23 10:30 PM): वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेणाऱ्या शारदा नामदेव खोब्रागडे या पोलीस शिपाई तरुणीचा मृतदेह पुलापासून काही अंतरावर शोधमोहिमेत रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आढळला. याप्रकरणी मृतक युवतीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार करीत प्रेमातून आलेल्या नैराश्यामुळे तिने आत्महत्या केली असून यास तिचा प्रियकर जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
शारदा खोब्रागडे यांनी पुलावर आपली दुचाकी उभी केली. तिथेच मोबाईलसुद्धा ठेवला आणि थेट नदीत उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिकडे धाव घेतली. सोबत आरमोरी तहसील कार्यालयाच्या बचाव पथकाच्या मदतीने वैनगंगा नदीच्या प्रवाहात संध्याकाळपर्यंत शोध घेतला, पण थांगपत्ता लागला नाही. वैनगंगा नदीच्या पुलावर यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
विशेष म्हणजे आतापर्यंत वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी पातळी खालावलेली होती. पण गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामुळे गेल्या तीन दिवसात पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे शारदा खोब्रागडे नदीच्या प्रवाहात वाहून तर गेल्या नाही ना, अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्या अविवाहित होत्या असे समजते. त्यांनी या पद्धतीने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागे नेमके कोणते कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.