चंद्रपूर:- काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते अवघ्या 48 वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. (Sad demise of MP Balu Dhanorkar)
धानोरकर यांना किडनीसंबंधीच्या आजारावर उपचारासाठी आधी नागपूर (Nagpur) येथील खासगी उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वीच एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली (Delhi ) येथे नेण्यात आले होते. तेथे मेदांत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मागील दोन दिवसांपासून बाळू धानोरकर व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे कुटुंबिय देखील दिल्लीत दाखल झाले होते. त्यांच्य प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती काल मिळत होती. मात्र आज रात्री 2 वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती समोर आली.
बाळू धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज दुपारी 12 वाजेपर्यंत वरोरा येथे आणले जाण्याची शक्यता असून, दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील, अशी माहिती मिळत आहे.
धानोरकर यांची राजकीय कारकीर्द
काँग्रेसमध्ये येण्याआधी बाळू धानोरकर शिवसेनेचे वरोरा विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत लोकसभेची निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीत ते चंद्रपूरच्या मतदारसंघातून विजयी झाले होते.