सिरोंचा (गडचिरोली) : तालुक्यातील चिटूर येथील महाराजस्व शिबिरात सहभागी होऊन गावी परतताना ट्रॅक्टर उलटला. यात दोन महिला ठार झाल्या, तर ३० जण जखमी झाले. २६ एप्रिलला सायंकाळी दुबपल्लीजवळ ही घटना घडली. गंगूबाई लक्ष्मय्या गोसुला वय ६०, मलक्का जाकलू माडेफू वय ४५, दोघी रा. लक्ष्मीदेवीपेठा, ता. सिरोंचा), अशी मयतांची नावे आहेत.
चिटूर येथे २६ एप्रिलला तालुका प्रशासनाच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत शासकीय योजनांची जत्रा हा कार्यक्रम पार पडला. यात नागरिकांना विविध योजनांचा थेट लाभ देण्याचे प्रशासनाचे धोरण आहे. त्यासाठी परिसरातील नागरिकांना चिटूर येथे येण्यासाठी निमंत्रण दिले होते. लक्ष्मीदेवीपेठा येथून २७ महिला व पाच पुरुष गेले होते. शिबिर आटोपल्यावर ते ट्रॅक्टरमधून गावी परतत होते. दुबपल्लीगावाजवळ चालक रमेश चंद्रय्या बोरय्या (रा. लक्ष्मीदेवीपेठा) याचा ताबासुटल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याखाली जाऊन उलटले. यात गंगूबाई गोसुला व मलक्का माडेफू या जागीच ठार झाल्या, तर २५ महिला व पाच पुरुष जखमी झाले.
जखमी झालेल्याची नावे : जयाडी येल्लक्का, मोरला चिन्नक्का मदनय्या, चिक्काला सम्मय्या दुर्गय्या, आकुला संतोषा कोन्नी, आंबडी सम्मय्या राममेरा, पेद्दी बुच्चक्का मल्लया, आंबडी चिन्नक्का मल्लय्या, चिंतला पोसक्का बापू, गुरनुले मुत्यालू बानय्या, इंगाक्का मुत्यालू गुरनुले, लंगारी लक्ष्मी पोचम, अंकन्ना पोचम पेद्दाबोंइना, जीडी मारन्ना लस्मय्या, गोगुला शांता बालय्या, चिन्नक्का मल्लय्या मडे, शानगोंडा मल्लक्का महांकाली, लंबडी चिन्नामल्लू शामराव, देवक्का चिन्नना आरे, रामक्का मदनय्या जयाडी, लंबडी लस्मा चंद्रय्या, गुरनुले सम्मक्का किष्टय्या, सम्मय्या मोंडी कारकरी, चिंताकुंटला बुच्चक्का किष्टय्या यांचा जखमींत समावेश आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून स्थानिकांनी सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
१६ जखमींना हलविले मंचरालला
प्रकृती चिंताजनक बनल्याने १६ गंभीर जखमींना तेलंगणातील मंचराल जिल्ह्यात उपचारासाठी पाठविण्यात आले. उर्वरित जखमींवर सिरोंचा येथे उपचार सुरू आहेत. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने जखमी दाखल झाल्याने ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व परिचर यांचा कस लागला. उपचाराकामी सर्वजण धावपळ करताना दिसून आले.