ब्रम्हपुरी : तालुक्यातील चिखलगाव येथे रात्रीच्या सुमारास जीवन वाहिनी असणारी वैनगंगा नदी वाळू तस्करांमुळे संकटात सापडली आहे. चिखलगाव परिसरात असलेल्या वैनगंगा नदी पात्रातून वाळूसाठी उघडपणे खोदकाम सुरू असून नदीपात्राची अक्षरशः चाळण झाली आहे.
चिखलगाव परिसरात गेल्या अनेक महिना भरापासून हे खोदकाम करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरचा वापर करून गावातील मुख्य रस्त्याने वडसा, ब्रम्हपुरी, सुरबोडी, जुनी वडसा ही अवैध रेती वाहतूक होत असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकारात काही स्थानिक व्यक्तींचा सहभाग घेतल्याने वाद नको म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अर्थात वाळूतस्करीचा हा व्यवसाय काही स्थानिक यंत्रणांना हाताशी धरून केला जात असल्याने तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न नागरिकांना आज निर्माण झालं आहे.
वैनगंगा नदी तालुक्यातील एकमेव मोठी नदी आहे. यंदाच्या पावसाळ्यात या नदीला महापूर आलं होत. जुन्या रपत्याची दुरुस्ती आजही झाली नाही. जानेवारीपासून नदीचा प्रवाह थांबल्याने अनेक ठिकाणी पात्र उघडे आहे. ही ठिकाणे आता वाळू माफियांचे लक्ष्य आहेत.