ब्रम्हपुरी :- तालुक्यात अवैधरीत्या रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणावर केला जात असून काही गावातील नागरिक यावर आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करीत असता रेती तस्कर हमारी-तुमरी वर येत असल्याने रेती तस्करीवर आळा घालणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेती तस्करांच्या मुजोऱ्या वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे प्रशासन सुस्त तर रेती तस्कर मस्त; अशी परिस्थिती पहावयास मिळत असल्याने तालुक्यातील अनेक रेती घाट अवैध तस्करांच्या विळख्यात सापडले असल्याचे हल्ली सर्वत्र चित्र दिसून येत आहे.
२७ फेब्रुवारी २०२३ ला पर्यावरण विभागाने शासन आदेश काढत रेतीघाट बंद केले.तरीसुद्धा तालुक्यातील अर्हेर नवरगाव,चिखलगाव,रणमोचन, खरकाडा, सोंन्द्री, बोढेगाव, बोळधा,हळदा,आवळगाव,चिखल - धोकळा,कोलारी,बेलगाव या नदीपात्रातून रेतीचा विनापरवाना अवैधरीत्या उपसा मोठ्या जोमाने सुरू आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
शहरातून दिवस-रात्र विनापरवाना रेतीची अवैधरीत्या तस्करी होत आहे.स्थानिक गावातील नागरिक रेतीतस्करांना विरोध करीत आहेत; पण वाळू तस्कर अरेरावीची भाषा करीत तक्रार केल्यास धमकी देतात.मात्र,यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
काही नागरिकांनी गुरुवारी अहेर नवरगाव नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्या एका टिप्परला अडवून विचारणा केली.त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा वाळू परवाना नसल्याचे समोर येताच त्यांनी ११२ वर कॉल केला पण पोलिस प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तब्बल दोन तास त्या टिप्परला अडवून ठेवले होते; परंतु कोणतेच अधिकारी,कर्मचारी कारवाईसाठी धजावले नाहीत.
अवैध रेती तस्करीवर प्रशासनाकडून जोपर्यंत कठोर पावले उचलली जाणार नाही.तोपर्यंत सर्वत्र असेच चित्र दिसून येणार असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.