वर्धा : अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला घरात ओढण्याचा प्रयत्न करित विनयभंग करणाऱ्या नराधमास सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हा निर्वाळा अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही.टी.सूर्यवंशी यांनी दिला.
पद्माकर विठोबा खेवले वय ५४ रा. वायगाव (निपाणी) असे आरोपीचे नाव आहे. २५ मार्च २०२२ रोजी कार्यक्रम असल्याने सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास फिर्यादीने आरोपीला घरुन मोठे गंज आणायला सांगितले होते. तेव्हा आरोपीसोबतच पीडिताला मोटरसायकलवर पाठविले. आरोपी घरी जाऊन गंज काढले आणि पीडितेला घरात येण्याचा इशारा केला. त्यामुळे पीडितेचा हात पकडून आत ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडितेने घाबरुन हाताचा झटका देत पळ काढला. घरी जावून हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर देवळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
महिला पोलीस उपनिरीक्षक पुष्पा बोचरे यांनी तपास करुन सबळ पुराव्याच्या आधारे गुन्हा दाखल केला. तसेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. व्ही.टी.सूर्यवंशी यांनी आरोपी पद्माकर खेवले यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय घुडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून समीर कडवे यांनी सहकार्य केले.