देसाईगंज : तालुका मुख्यालयापासून ते कोंढाळा हायवे रस्त्यालगत दोन्ही बाजूला गेले कित्येक महिन्यांपासून झाडे-झुडपे व कचऱ्याची वाढ झाली असल्याने दिवसा व रात्रोच्या सुमारास सायकलस्वार दुचाकी चालक चारचाकी चालक व इतर अवजड वाहन चालकांना रस्त्यालगतचा कचरा व झाडे झुडपांमुळे मुख्य हायवे मार्ग दिसेनासा होऊन अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले, असल्याने देसाईगंज-कोंढाळा हायवे रस्त्यालगतची झाडे-झुडपे व कचऱ्याची साफसफाई करावी, अशी मागणी कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांनी केले आहे.
देसाईगंज ते कोंढाळा मुख्य हायवे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे व कचऱ्याने वेढा घातला आहे. मार्गावरून रात्रोच्या सुमारास बेधडकपणे वाहने चालत असतात. एखादे वाहन रात्रीच्या सुमारास समोरील येणाऱ्या वाहनास अप्पर डिप्पर देत नसल्याने सदर वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन मोठ्या प्रमाणावर अपघात घडल्याच्या घटना हल्ली निदर्शनास येत आहेत. त्याचप्रमाणे वळणावरील झाडे-झुडपे व कचऱ्यामुळे दिवसाढवळ्या येणारे वाहन सुद्धा दिसत नसल्याने वाहनांची समोरा-समोर धडक मारली जाऊन अपघात होत आहेत. देसाईगंज ते कोंढाळा मुख्य हायवे मार्गावर सर्वात जास्त अपघातांचे प्रमाण वाढले आहेत.
मागील काही महिन्यांपासून युवक वयोवृद्ध आबालवृद्ध व इतर अनेकांचे अपघात घडून नाहक बळी पडले आहेत. अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता संबंधित विभागाने मुख्य हायवे रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंची तीन ते चार मिटर अंतरा पर्यंतची झाडे-झुडपे व कचऱ्याची साफसफाई करणे आवश्यक आहे. जेणेकरून अपघात घडू नये व नाहक कुणाला आपला जीव गमवावा लागू नये, याकरिता संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष न करता देसाईगंज-कोंढाळा हायवे रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूची झाडे-झुडपे व कचऱ्याची साफसफाई करून योग्य ती विल्हेवाट लावावी, अशी मागणी कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांनी केले आहे.