चंद्रपूर:- चंद्रपुरकरांना २०० युनिट वीज मोफत देण्यात यावी ही मागणी मी विसरलेलो नाही. कारण ही केवळ मागणी नसून तो आमचा हक्क आहे. हक्कासाठी झालेला उठाव इतिहास घडवतो. आजची ही अधिकार बाईक रॅली चंद्रपूरच्या आंदोलनांच्या इतिहासात नोंदविली जाणार आहे. या मागणीसाठी जिवणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची माझी तयारी असून यासाठी मी जेव्हा जेव्हा हाक देईन तेव्हा एकत्रित या, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. रॅलीला संबोधित करतांना आमदार जोरगेवार बोलत होते.
चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील २०० युनिट वीज मोफत देण्यात यावी. शेतकऱ्यांना वीज मोफत देण्यात यावी. रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी (दि.२६) आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपूर अधिवेशनावर भव्य अधिकार बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक बलराम डोडाणी, माता महाकाली महोत्सव चे अध्यक्ष अजय जयस्वाल, एमआयडीसी असोसिएशन अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, आदींची उपस्थिती होती.
आ. जोरगेवार म्हणाले, राज्यात सर्वाधिक वीज उत्पादन करणाऱ्या जिल्हांमध्ये चंद्रपूर जिल्हाचा समावेश आहे. जवळपास ५ हजार मेगावॅट पेक्षा अधिक वीज आम्ही निर्माण करतो. ही औष्णिक वीज आहे. त्यामुळे यातून होणारे प्रदुषण प्राण घातक आहे. शेतीला याचे मोठे नुकसान होत आहे. प्रदूषणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे वयोमान ५ ते १० वर्षांनी घटले आहे. या औष्णिक वीज प्रकल्पातून होणाऱ्या प्रदुषणाची इतकी मोठी किंमत मोजत असतानाही केवळ दोन ते अडीच रुपये प्रति युनिट रुपयात तयार होणारी वीज आम्हाला ५ ते १५ रुपये प्रति युनिट दरात विकत घ्यावी लागत आहे. जागा, पाणी, कोळसा, आमचाच आणि वीजही आम्ही महाग घ्यायची, हा अन्याय आहे. या विरुध्द आम्ही पूर्ण ताकदीने संघटित होउन लढणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.