देसाईगंज : बहुप्रतीक्षित वडसा-गडचिरोली या ५२ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या उभारणीत असलेल्या बहुतांश अडचणी दूर करण्यात आता प्रशासनाला यश आले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने सुधारित खर्चास नुकतीच मान्यता दिल्यामुळे या प्रकल्पाची पुढील कामे करण्यास गती येणार आहे.
आतापर्यंत या रेल्वेमार्गासाठी आवश्यक असणाऱ्या खासगी जमिनीपैकी ६४ टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. अविकसित गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा मुख्यालयाला आणि दक्षिण भागातील तालुक्यांना रेल्वेमार्गानि जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे.
वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी १३२ हेक्टर खासगी तर १७. २ हेक्टर सरकारी जमिनीची गरज आहे. त्यापैकी ८५ हेक्टर खासगी जमिनीची खरेदी झाली असून १५. ९३ हेक्टर सरकारी जमिनीसाठीही मंजुरी मिळाली आहे उर्वरित जमीन अधिग्रहणातील त्रुटी दूर होताच ती जमीनही ताब्यात घेतली जाणार आहे. खासगी जमिनीच्या अधिग्रहणासाठी ९२ कोटींची गरज होती. आतापर्यंत जमीन अधिग्रहणासाठी निधीची कमतरता पडली नाही. मात्र आता पुढील टप्प्यातील कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लवकर निधी देण्याची गरज आहे. तो मिळेल असा विश्वासही संबंधित अधिकाऱ्यांना वाटतो.