वडसा:- देसाईगंज वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उसेगाव या गाव जवळील जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजता च्या दरम्यान घडली. वाघाच्या हल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव प्रेमपाल तुकाराम प्रधान वय 45 असून ऊसेगाव येथील रहिवासी आहे. या गावात गणेश मंडळाच्या पंडाल मध्ये लावलेल्या माईक वरून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातील लोकांना जंगलात जाऊ नये, तसेच मागील दोन-तीन दिवसापासून जंगलामध्ये वाघाचा अस्तित्व असल्याचे दिसून आलेले आहे, अशी मुनादी सकाळी सात वाजता च्या दरम्यान दिली होती, मृतकाने ही मुनादी आपल्या कानाने ऐकून सुद्धा घरातील काड्या आणि झाडणी बनवण्याच्या मोहापायी जंगलामध्ये जाताच वाघाने अचानकपणे झडप घालून त्याला जागीच ठार केले.
शुल्लक कामाकरिता जंगलात जाण्याचा उत्साह लोकांनी न सोडल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे.
जंगलात जाणाऱ्या लोकांना अनेक माध्यमांद्वारे वारंवार ताकीद देऊन वन विभागाचे कर्मचारी दिवस रात्र शोध मोहीम राबवून वाघाच्या हल्ल्यातून लोकांचे कसे रक्षण करता येईल यासाठी उपाययोजना करीत आहेत तरीही लोकांकडून मुद्दामपणे वन विभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे वन विभागासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
सकाळच्या सुमारास उसेगावात वाघाच्या हल्ल्याची माहिती मिळताच वन विभागाची यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा ही घटनास्थळी पोहोचलेली होती घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे. या वाघाच्या हल्यामुळे उसेगाव परिसरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरलेली असल्याचे दिसून येत आहे.
या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली असता मागील आठ दिवसापासून ताडोबा येथील वन विभागाचे पथक वाघाला पकडण्यासाठी जेरबंद करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करीत असताना, अशा वेळेस वन विभागाच्या सूचनेकडे लोकांनी दुर्लक्ष केल्याने, वन विभागाच्या कामांमध्ये मोठी अडचण निर्माण होत आहे अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.