सावली:- अवैध व्यवसाय करणारे काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. चक्क ट्रॅव्हल्स मधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमासालाची वाहतूक करीत असतांना सावली पोलिसांनी कारवाई करुन ट्रॅव्हल्ससह प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त केला आहे.
सदर कारवाई गुरुवार 15 सप्टेंबर ला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान करण्यात आली. या कारवाईत ट्रॅव्हल्ससह 15 लाख 32 हजार 266 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व ट्रॅव्हल्सचे चालक व वाहक यांच्यावर विविध कलमांव्ये पोलीस स्टेशन सावली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून ट्रॅव्हल्स, टॅक्सी धारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्राप्त महितीनुसार, रायपूर ते चंद्रपूर जाणाऱ्या सीजी 19 एफ 0833 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्समधून राजश्री पान मसाला, विमल पानमसाला, ईगल सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सावली पोलिसांना मिळाली असता सापळा रचून गुरुवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान सीजी 19 एफ 0833 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स ला थांबवून झडती घेतली यावेळी प्रतिबंधित तंबाखू व पानमसाला आढळून आला. या प्रकरणी ट्रॅव्हल्स किंमत 15 लाख रुपये व प्रतिबंधित तंबाखू व पानमसाला असा 15 लाख 32 हजार 266 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ट्रॅव्हल्स चालक तरकेश्र्वर साहू (43) रा. भेंडीकला जि. राजनांदगाव छ.ग. वाहक बिर किशोर सूनानी (33) रा. रायपूर छ. ग. तुमेश कुमार साहू वर (28) रा. सुखी जिल्हा रायपूर छ. ग. यांच्यावर कलम 188,272, 273 भादवी सह कलम 59 अ अन्न सुरक्षा मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, ठाणेदार आशिष बोरकर पोलिस स्टेशन सावली यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ दादाजी बोलिवार, पो.हे.का दर्शन लाटकर, ना.पो.का विशाल दुर्योधन यांनी केली.सदर कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले असून ट्रॅव्हस, टॅक्सी धारकांमध्ये खळबळ उडाली आहे.