जबलपूरः मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील एका खासगी हॉस्पिटलला भीषण आग लागली. त्यात हॉस्पिटलचे तीन मजले जळून खाक झाली. यात दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. हॉस्पिटलमधील सहा रुग्ण, चार हॉस्पिटल कर्मचारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या हॉस्पिटलमध्ये ३५ हून अधिक लोक उपस्थित होते. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
जबलपूरमधील विजयनगरमध्ये असलेल्या न्यू लाइफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटच्या कारणातून लागली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. आग वेगाने फैलावली. काहीच वेळात तीन मजली इमारतीला आग लागली.
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला. काही लोक जीव वाचविण्याच्या आक्रांताने पळत होते. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना जागचे हलता आले नाही. त्यांच्या जागीच होरपळून मृत्यू झाला. दुसऱ्या मजल्यावरील जास्त जणांचा मृत्यू झाला. आगीत जखमी झालेल्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आग लागल्यानंतर हॉस्पिटलमध्ये वाचविण्यासाठी गेलेल्यांचा काही जणांचा मृत्यू झाला. तब्बल एका तासानंतर आग आटोक्यात आणली.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबाबात दुख व्यक्त केलय. मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये, तर गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.